Thursday, February 18, 2010

तुझ्यामुळेच

आयुष्याच्या एका वळणावर
अचानक तुझी भेट झाली
अन
दिशाच बदलली माझ्या जगण्याची

मी आणि माझे
एवढ्याच विश्वात
अडकले होते मी

कौतुकाच्या शब्दांनी
अन
"मी आहे" सारख्या आश्वासक स्पर्शांनी
कायम बळ दिले आहे मला

आज
माझ्या डोळ्यात हसु आहे
अन कोणतेही संकट झेलायला घाबरत नाही
ते फक्त तुझ्यामुळेच

समोरच्याला समजुन घेण्याची
प्रेमाने काळजी घेण्याचेही
तुच शिकवलेस मला

सुंदरशी स्वप्ने बघायची
स्वाभिमानाने अन हसतमुखाने साथ देत
सत्यात उतरवायची हेच खरे सहजीवन
हे तुच शिकवलेस मला

आज माझे जग परिपूर्ण आहे तुझ्यामुळे
तुच आहेस कणखर आधार माझ्या आयुष्याचा
म्हणुनच कर्मभुमीवर मी आत्मविश्वासाने सांगु शकते
मी जी आहे ती
फक्त तुझ्यामुळेच

Wednesday, January 6, 2010

काल ॰॰॰॰॰॰॰॰ आज

काल रुतला काटा जरासा , वेदनेने जीव तळमळे
आज चालतो निखा-तुनी , वेदनेचे दुःख नाही

काल झाला उपहास जरासा , आसवांनी चिंब झालो
आज झेलतो घाव जिव्हारी , आसवांचा थेंब नाही

काल सुटता हात जरासा , एकटेपणाने बावरलो
आज सोबतीला नाही कुणी , एकलेपणाचा सय नाही

काल होतो सुखात जरासा , कण दुःखाचा करी भयार्त
आज नांदतो सुखाविन जरी , दुःखाचे कण भय नाही

Tuesday, December 8, 2009

नियती

राजा असो वा रंक
कुणाचीही नियतीपासुन सुटका नाही.

कधी फेरा वैमनस्याचा, द्वेषाचा
तर कधी
आपलेपणाचा, प्रेमाचा
वा कधी क्वचित आपल्याच चुकीचा.


आयुष्यभर सुखदुःखात
साथ देण्याचे वचन
मी ज्याला दिले
तो देखील असाच सापडला
नियतीच्या फे-यात
आणि
नशिबी आला वनवास.


स्थितप्रज्ञासारखे सारे स्विकारले त्याने.


सौभाग्य हेच
सर्वस्व मानणा-या
अनेक जणींपैकी मी
स्विकारला नियतीचा फेरा
त्याच्यावरील प्रेमामुळे.


तो म्हणजेच
जीवन, परमेश्वर
समजणारा त्याचा बंधु.


त्यानेही स्विकारला फेरा
सर्वस्वाची आहुती देवुन.


प्रत्येक जण समाधानी आहे
आपापल्या कृतीबद्दल
आणि हेच बहुधा बळ आहे
चालण्याचे या खडतर वाटेवर !


पुढे काय ?
आम्हास ठाउक नाही.
निसर्गाशी हितगुज करत तर
कधी हिंस्त्र श्वापदांबरोबर
दोन हात करत
चालु आहे आमचे मार्गावरुन चालणे.
निसर्ग हाच पाठीराखा
त्याच्याच कुशीत विसावतो
तोच आधार जगण्याचा
त्याने आम्हाला निराश केले नाही
पुढेही करणार नाही
ही खात्री आहे.


मार्गक्रमणा चालुच रहाणार.
नियतीचे फेरे चालुच रहाणार.

Saturday, November 14, 2009

"शोध"


ऊंच कड्यावरुन
खोल दरीतुन
काट्यातुन तर कधी हिरवळीवरुन
नादात , धुंदीत धावणारी मी

मनमुराद प्रेम करणारी
हितगुज करणारी
हसणारी कधी तर कधी गंभीर
नादात , धुंदीत बोलणारी मी

पण
तो समोर येताच शांत शांत होते
अल्लड अवखळ मी जणु पूर्णत्वाला पोहचुन पोक्त गंभीर होते
सान्निध्यात त्याच्या माझा कण न् कण धारण करतो सहस्त्र योजनांचे अंतर

हि किमया कोणाची ? माहित नाही
हीच असते का वैश्विक अनुभुती ? माहित नाही

मी एक पाण्याचा थेंब
होवुन येते जीवनयात्रेत ,
चालता चालता होते झरा आणि पूढे नदी

माझ्यासारखे अनेक असतील वाटा शोधत आयुष्यात

होईल का त्यांचा शोध पूर्ण , माझ्यासारखा ?

Thursday, October 22, 2009

"कळीचे मनोगत"बघायची नाही कुणाची वाट
थांबायचे नाही होण्या पहाट

श्वासात भरुनी गंध मातीचा
डोळ्यात काजळ थेंब तेजाचा

वा-याच्या ताली डोलत राहून
तुषार जलाचे अंगी झेलून

आपले आपणच उमलायचे
नव्या जगाला सामोरे जायचे

कधी देवाच्या मस्तकी शोभायचे
कधी मर्तिकाच्या पायी पडायचे

करायचे नाही कशाचेच दुःख
उमलण्यातच मानायचे सुख

"नात्यांचे धागे"

नात्यांच्या धाग्यांनीच
बांधलेलो असतो आपण
जन्मापासुन मृत्युपर्यंत॰

धागे असतात कधी रेशमाचे वा गळफासाचे
तर कधी बनतात प्रेमाचे हुंकार वा क्रोधाचे फुत्कार

धागे कधी असतात डोळ्यातील पाणी वा ओठातील गाणी
तर कधी बनतात हृदयी आतुर वा अलिप्त

धागे कधी असतात विश्वासपात्र वा करती घात
तर कधी बनतात दिपस्तंभ वा चकवा चांदणं

तसे आपण
प्रत्येकजण
अश्वत्थामा

आपापल्या नात्यांपुरते॰

रक्ताळलेल्या जखमांवर
शीतलतेचे तेल मागत
वणवण फिरतो नात्यांच्या दारोदारी॰

"यात्री"

मी युगानुयुगे फिरतोय
या जन्मातुन त्या जन्मात॰

कधी जन्म मलुल गांडुळाचा तर कधी रुबाबदार वनराजाचा
कधी फुल बनुन सुगंधाची उधळण करतो तर
कधी विषवृक्ष बनुन पांथस्थांचा चावा घेतो
कधी नाग बनुन मी सरपटतो तर कधी वैनतेयाची भरारी घेतो
असहाय्य दुर्बल दरिद्री बनुन जीणे जगतो तर कधी राजमंचकी लोळण घेतो

माझे प्राक्तन , माझेच कर्म विधीलिखित बनुन
सटवाईच्या रुपाने लेखन करते
मीच कर्ता,करविता,विधाता माझ्या जीवनाच्या घडामोडींचा

परंतु
भ्रमिष्ठ कस्तुरीमृगासम

वणवण फिरतोय या जन्मातुन त्या जन्मात
शोध घेत माझ्या अस्तित्वाचा॰